ऐसा महाकवीचा गाव!
वसंत वाहोकार
कब्रितला समाधिस्थ म्हणा, देवदूत म्हणा, नाहीतर मोकाट ग्रहांचा फकीर म्हणा, ते
गायधनीच.
‘माझी कविता शब्दांची लेकुरे कुशीत घेऊन
निर्वासितांच्या छावनीत एकटीच बसली आहे.’
ही सुधाकर गायधनींची कविता! डॉ. द.भि. कुलकर्णी म्हणतात तशी ही कविता, ‘गायधनींची कविता ही केवळ ‘मी’ची किंवा समाजाची किंवा वेदनेची किंवा निसर्गाची कविता नाही. ती या साऱ्यांमधील मूलभूत संबंधाचा वेध घेण्याचा प्रयत्न ही कविता करते? म्हणूनच ती निर्वासितांच्या छावनीत ेएकटीच बसलेली दिसते.
एका कवीचं सुजाणपण येण्याच्या ऐन वयात गायधनींचा पहिला कवितासंग्रह आला, तो ‘कब्रितला समाधिस्त.’ या संग्रहाने उभ्या मराठीचे आणि महाराष्ट्रातील तमाम नामवंतांचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आणि कवी म्हणून गायधनींनी- आपली नाममुद्रा पक्की केली.
फार तर असे म्हणता येईल की, हा झाला इतिहास. आता तो मागे म्हणजे, फार मागे पडला. निदान पस्तीस एक वर्षे तरी.
‘चंदनाची चंद्रकोर
चहुवार ब्रह्म डोले
रूप पाणियात न्हाले
अंतरंग चिंब ओले.’
अशी कविता गायधनीच लिहीत होते. कविश्रेष्ठ मर्ढेकरांचे जे सामथ्र्य होते आणि त्यांची अफाट प्रतिमासृष्टी थक्क करीत होती, तिथवर गायधनी पोहोचल्याचे संकेत अशा कवितांमधून सहज मिळत होते.
हे सामथ्र्य नरहर कुरुंदकरांनाही जाणवले होते, म्हणूनच त्यांनी ‘समाधिस्थ’ बद्दल लिहिताना कवीला लिहिले होते, ‘सुर्वे यांच्या पहिल्या संग्रहापेक्षा तुमचा पहिला संग्रह चांगला व दमदार आहे. सुर्वे यांच्या दुसऱ्या संग्रहापेक्षा तुमचा दुसरा संग्रह सामथ्र्यशाली व्हावा या भावनेने मी हे लिहिले आहे. खोटी औपचारिक स्तुती करण्यापासून मी स्वत:ला शक्यतो दूर ठेवतो. कुरुंदकरांचे ते अपेक्षित नंतर या कवीला सहजपणे साध्य झाले.
कविता दमदार आणि जोमदार असली तरी तिला थोरामोठय़ांचे आशीर्वाद आणि प्रशस्तीपत्रे लागत होतीच. कवीला ती मोठय़ा प्रमाणात लाभली. ते मान्य करतीलच. परंतु, बरेचदा या प्रशस्तीपुरात कविता आणि कवी दोघेही वाहून जातात, हेलकावे खातात. मग गायधनींचे काय झाले? गायधनींनी काय वाटेल ते केले असेल.. थोरामोठय़ांना शिव्याही घातल्या असतील.. ‘अशा शेकडोंनी कविता मी काखा खाजवून पाडून टाकतो’ एवढी तीव्र-संतापाची भाषाही वापरली असेल किंवा गीत-भावगीत लेखनाबद्दल बोलताना शौचालयातील सहजनिर्मिती असे डंखही मारले असतील.. परंतु त्या दर्पात न अडकता आपली कविता राखली-सकस केली. तिथे बळ सर्वागाने एकवटून ठेवले.
प्रसंगी थोरामोठय़ांना उपहासाने नाकारले- फटकारले- ती त्यांची कलंदरी बाजूस ठेवली तरी, कवी म्हणून घडत जाणे आणि मोठय़ा नामावलीत समाविष्ट होण्यासाठी नेटाने-जिद्दीने पुढे जात राहाणे, हे सच्चेपण तरी मान्य केलेच पाहिजे. खरे आहे ना हे सुधाकरराव?
‘पावसाची गाणी गात राहिल्याने
पाऊस फिदा होत नाही
आकाश भाडय़ाने घेऊ पाहाणाऱ्यांनो..
सौदा पावसाचा होत नाही.’
या ओळींमधला तिरकस आशय, खणखणीत इशारा कुणीही मराठी वाचक, कवितेचा अस्सल आस्थेवाईक लक्षात घेईलच आणि तरीही जी माती गायधनींची म्हणून आहे.. तिचा गंध त्याला वेड लावेलच लावेल.
कब्रितला समाधिस्थ, देवदूत, मोकाट ग्रहांचा फकीर, गोफणगोटा, महावाक्य, हे सर्व कवी सुधाकर गायधनींचे कवितासंग्रह, ‘देवदूत’ बद्दलच्या अपेक्षा फार मोठय़ा होत्या आणि सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले होते. सामाजिक दंभाचा स्फोट करणारी ही कविता होती..
‘या वस्तीतील लोकांचे हात चंद्रापर्यंत पोहोचले असते तर, त्यांनी चंद्रच भाकरीसारखा खुडून खुडून खाऊन टाकला असता
इतकी भेदून जाते. या पोटाची आग’
हे चिंतन या कवीमुळे आम्हाला समजले.. ते कुठून आले आणि कसे आले. चिंतन-तत्त्वज्ञानातील रूक्षता ओलांडून तरल-तादात्म्याने आशयाशी भीडणे गायधनींना कसे शक्य झाले?
‘समुद्र उपसून काढावा लागतो तळगाभ्यातून
जशी माऊली आतडे उपसून
हलकी होते, लेकरू पाहून.’
महाकवी तुकारामांच्या प्रेमात, जख्ख बंधनात गायधनी आहेत. म्हणूनच तो लडिवाळपणा गायधनींना सहज प्राप्त झाला. अभंगांशी अधिक जवळिकीचे नाते सांगणारी कविता हा कवी सहज-सुकर लिहून जातो. गायधनींची कविता समीक्षेच्या तोलकाटय़ावर उपेक्षित राहिली. ती वाचकप्रिय झाली. रसिकांनी डोक्यावर घेतली.. पण अस्सल मराठी समीक्षेने तिला दूरच ठेवले इथपासून तर सुधाकर गायधनी हे कवी आहेत.. महाकवी वगैरे सारे खोटे आहे इथपर्यंत अनेक प्रकारचे वाद-प्रवाद वेळोवेळी उठत राहिले. गायधनी त्यात अडकले नाहीत, त्यांनी पर्वाही केली नाही. मैत्रीत वा खाजगी संभाषणात एकेकाची जाडाझडतीही घेतली. जागाही दाखवून दिली आणि जराही विचलित न होता आपले वल्हें सांभाळून होडी वल्हवित गेले. कवी किंवा महाकवी म्हणून जेवढी चर्चा झाली त्यापेक्षाही जास्त चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच अधिक झाली. त्या चर्चेत त्रयस्थ कमी आणि मित्र, हितचिंतक अधिक होते, हे मोठय़ा मनाने गायधनीही मान्य करतील, कारण माणसांचा-व्यक्तींचा त्यांचा व्यासंग भक्कम आहे. निर्विवाद.
‘रायबाई भुलाबाई’ ‘प्रेषितांचे बेट’ सारखी विशेष नाटके याच कवीने लिहिली-गाजवली. मराठी आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे नेली. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय केले नाही? समीक्षणे आणि संपादन केले तसेच सदरलेखनही केले. एका मोठय़ा वृत्तपत्राशी ते जुळलेले होते, वषरेन्वर्षे राबत होते. वस्तुस्थिती काय असेल ती असेल पण ती ‘नेमबाजी’ सुद्धा कधीतरी उलटली.. आणि गायधनी आजाद झाले. ‘घरठाव’ हा शब्द सहज वापरला जाईल असा हा कवी नाही. मात्र, त्यांनी दुसरे घर केले आणि तिथेही आपल्या लेखणीचे धारदार शस्त्र परजून ठेवले.. वर्तमानाचे नंगधडंगपण अधिकाधिक उजळ केले. कधीही कोण्या व्यक्तीची, संस्थेची, संस्थेतील मान्यवरांची पर्वा केली नाही आणि गयही केली नाही. प्रसंगी यश पदरात पडले नसेल परंतु आपला लढवय्या बाणा कधी सोडला नाही. अशावेळी दूर जाणाऱ्यांची संख्या होती त्यापेक्षा अधिक संख्या जवळ येणाऱ्यांची होती, हा अनुभव वाटय़ाला यावा असा हा विरळाच अवलिया म्हणावा लागेल. अधूनमधून, सदर लेखनांतून त्यांना फटकारले गेले, चिमटे काढल्या गेले क्वचित् उपेक्षिल्याही गेले.. गायधनींनी या कशाला कधीच भीक घातली नाही.
‘तोलून मापून शब्द योजावावा
वाक्ये गाजवावा। अर्थभरे’
हा वसा गायधनींच्या कवितेने घेतला तो कधी सोडला नाही आणि एका विशिष्ट तरल-चिंतन अवस्थेत नाद-लय साकारत राहिली.
‘महावाक्य’ हे ‘महाकाव्य’ आहे तो वादाचा विषय असू शकत नाही.
‘जैसा जलाशय काठोकाठ
तैसा तुडुंब आशयमाठ’
असे मराठीपण आणि मराठीमन खच्चून भरलेली नवनवोन्मेजशालिनी कविता लिहिणे-लिहीत जाणे या कविला शक्य झाले आणि होईलही.
‘फोडणीला तेल नाही
दिव्यात कुठे घालू?
फाटलेल्या लुगडय़ाला
हसे पैठणीचा शालू.’
यातला तिरकस आशय आपण लक्षात घेतला तर.. तर कविवर्य सुधाकर गायधनी हे काय जालिम रसायन आहे हे कळेलच कळेल. मात्र, त्यासाठी आपले मन तेवढेच स्वच्छ-नितळ-स्फटिक असावे ना?
सुधाकर गायधनींना या आयुष्यात काय नाही मिळाले? काय काय नाही मिळाले? ते जगजाहीर आहे. मग ती पारितोषिके-बक्षीसे-सत्कार, सन्मान असतील किंवा साहित्य संमेलनांची अध्यक्षपदंही असतील, सारे भरभरून मिळाले. रसिकांचे अपार प्रेम लाभले.. आणि श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद सावलीच्या झाडांसारखा रस्ताभर होताच होता. त्यांची कविता भाषांतर-अनुवादातून परमुलखात पोहोचली.. परभाषेत गाजली.. ‘महाकवी सुधाकर गायधनी विशेषांक’ देखील मराठी रसिकांच्या पदरात पडले. आजचा हा सन्मान आणि हे अध्यक्षपद या गावाने, या मित्रपरिवाराने, या सग्यासोयऱ्यांनी त्यांना बहाल केले.. त्या अध्यक्षपदाचा सन्मानच झाला. सुधाकरराव! तुमचे खुल्या दिलाने स्वागत आणि मन:पूर्वक अभिनंदन! तुम्ही स्वीकारले तरी.. आणि नाकारले तरीही.