जळगावमध्ये राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन |
वार्ताहर / जळगाव
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे येथे ३१ ऑक्टोबर तर दोन नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे प्रा. जैमिनी कडू यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खा. ए. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी सुरू असल्याची माहिती सचिव प्रा. दिलीप चौधरी यांनी दिली आहे. मराठा बहुजन समाजाचे सांस्कृतिकरण व्हावे, त्यातून अखिल विश्वासातील मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न व्हावे या विश्वकल्याणाच्या भावनेतून तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे जळगाव जिल्हा बँकेच्या सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ. ऑम्वेट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन स्थळाला ‘क्रांतिवीरांगना कॅप्टन लिला पाटील साहित्य नगरी’ नाव देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी साहित्यदिंडी तसेच नवोदितांचे कवी संमेलन चंद्रपूरचे प्रा. दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. एक नोव्हेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ तसेच महापरिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाजातील १९ प्रमुख प्रतिनिधी आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यशोधक साहित्याचे डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. दोन नोव्हेंबर रोजी ‘शिकलेल्यांना अधिक समाजाभिमुख करण्यासाठी आवश्यक साहित्याचा आराखडा’ विषयावर डॉ. शरणकुमार लिंबाळे, रजनी ठाकूर, प्रदिप साळुंखे आणि सहित्यिक शरद पाटील यांची प्रकट मुलाखत तसेच स्त्री साहित्यातील कृषी संवेदना या विषयावर परिसंवाद होईल. संत साहित्यातील धार्मिक व सामाजिक चित्रे या परिसंवादाने संमेलनाचा समारोप होईल. बहुजन साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे |
No comments:
Post a Comment