Monday, November 9, 2009

‘तुकाराम महाराजांचे विचार सार्वकालिक’
नागपूर, २३ मे/प्रतिनिधी

नवीन पिढी कितीही पुढे गेली, आधुनिक झाली तरी, तुकाराम महाराजांचे विचार


सार्वकालिक आहेत हे वास्तव विसरता येण्यासारखे नाही, असा सूर पाचव्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनातील पहिल्या सत्रात उमटला.
मराठा सेवा संघप्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित या संमेलनातील पहिल्या सत्राचा विषय ‘सार्वकालीन संत तुकाराम महाराज’ हा होता. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ शहरातील इतिहास संशोधक व विचारवंत प्रा. अशोक राणा होते. यावेळी वक्ते म्हणून गोव्यातील गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ नाईक उपस्थित होते. व्यासपीठावर अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे, श्री गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वर रक्षक, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद माने, सिटिझन फोरमचे संयोजक डॉ. अशोक येंडे उपस्थित होते.
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा प्रभाव तुकाराम महाराजांवर होता. म्हणूनच शांती आणि सत्यावर तुकाराम महाराजांची अतिनिष्ठा होती. असत्याची चीड आली पाहिजे पण, त्याचबरोबर सत्य मांडताना प्राण अर्पण करायची तयारीही ठेवायला पाहिजे. संत तुकोबारायांचा हाच विचार प्रत्येकाने अंमलात आणावा, असे मत प्रा. अशोक राणा यांनी चर्चासत्रात मांडले. तुकोबारायांच्या अभंगातील स्वाभाविकपणा मांडताना प्रा. राणा यांनी यावेळी तुकाराम महाराजांनी रचलेले अनेक अभंग सादर केले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून नेहमीच संदेश दिला फक्त घेणाऱ्यांना तो घेता आला पाहिजे हे सांगताना त्यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. तुकोबारायांचे वास्तव्य ज्या परिसरात होते त्याच परिसरात शिवरायांचे कार्य बहरले हे प्रा. राणा यांनी आवर्जून सांगितले.
तुकाराम महाराजांनी सामान्य माणसांची उदाहरणे देऊन वैश्विक तत्त्वज्ञान जगासमोर मांडले आणि म्हणूनच ते सार्वकालीन ठरले, असे मत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी मांडले. तुकाराम महाराजांबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जातात. कुणी त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या असे म्हणतात तर, कुणी त्या जाळल्या गेल्या, असे म्हणतात पण, सत्य काय ते कुणालाही माहीत नाही, असे रामनाथ नाईक म्हणाले. संत तुकाराम महाराज सर्वकालीन तर आहेच पण, ते सर्वव्यापीसुद्धा आहेत, असेही नाईक यावेळी म्हणाले. चर्चासत्राचे संचालन माधवी शिंदे यांनी केले. ज्योती मोहरकर यांनी आभार मानले.

No comments: