Monday, November 9, 2009

मराठा साहित्याद्वारे इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे - श्रीमंत कोकाटे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लेखकांनी आतापर्यंतचा इतिहास विकृतपणे मांडला आहे. तो इतिहास मराठा साहित्याच्या माध्यमातून पुनर्लिखित करीत नव्याने मांडावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
मराठा सेवा संघप्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या सत्रात "मराठा साहित्याची भूमिका' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते गंगाधर बनबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून "प्रतिइतिहास'कार इंजि. चंद्रशेखर शिखरे, मनपाचे विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे-पाटील, भारतीय सेवा मंडळाचे राम आकरे उपस्थित होते. कोकाटे म्हणाले, "मराठी साहित्य हे केवळ पु. ल. देशपांडे, अत्रे व खांडेकरांचे साहित्य आहे. संत तुकारामाचे साहित्य हे मराठा साहित्य आहे. अलीकडे त्यात. मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा यांच्या साहित्याची भर पडली आहे. मराठा आणि ब्राह्मणी साहित्याची तुलना करताना ब्राह्मणी साहित्याने शिवाजी महाराजांचा संघर्ष धार्मिक संघर्ष म्हणून मांडला. मात्र, तो संघर्ष धार्मिक नसून राजकीय संघर्ष होता. याशिवाय संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न साहित्यात करण्यात आला. यातून पसरणारे विचार आपल्या मुलांना शिक्षणसत्ता आणि अर्थसत्तेपासून दूर ठेवण्याचे षड्‌यंत्र आहे. याविरुद्ध संघर्ष न केल्यास बहुजनांचे ब्राह्मणीकरण होईल.
मराठा साहित्यात समतेची व विश्‍वव्यापकतेची भूमिका आहे. ती भूमिका जगासमोर आणण्यासाठी इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची गरज आहे. जो इतिहास विसरतो, तो इतिहास लिहू शकत नाही, तेव्हा आजच्या पिढीने तो विसरता कामा नये. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अधिकाअधिक संशोधनात्मक, ललित, नाटक, कादंबरी, कविता यासारख्या साहित्याची निर्मिती करीत तुकाराम महाराजांची प्रतिमा उदात्त करावी, असे आवाहन त्यांनी केले. बनबरे म्हणाले, "मराठा साहित्य हे एका जातीला प्रेरक असे साहित्य नाही. ते सर्वांना प्रेरक आहे. या तुलनेत मराठी साहित्य संकुचित स्वरूपाचे आहे. आज भाषेचा दहशतवाद डोक्‍यात पसरविण्यात येत असून, तो डोक्‍यात शिरू न देता नवे प्रश्‍न नव्या भूमिका ठेवा. आजही आम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा, अशी शाहू-फुलेंची मागणी करतो. हा त्यांचा विचारांचा पराभव आहे. यावेळी इंजि. चंद्रशेखर शिखरे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन रजनी डहाके यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
..............

No comments: