Saturday, November 13, 2010

सातवे मराठा साहित्य संमेलन , सांगली

मराठीची व्युत्पत्ती संस्कृत, दक्षिण भारतीय भाषांतून नाही - डॉ. प्रतिमा इंगोले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा शोध संस्कृत किंवा दक्षिण भाषेच्या घेण्यातून चुकीचा इतिहास प्रचलित झाला. चुकीचे पायंडे पडत गेले, असे मत सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या परिसरात सुरू झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन उद्योजक शहाजीराव जगदाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, प्राचार्य पी. बी. पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

वऱ्हाडी लोकभाषेच्या अभ्यासक डॉ. इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दल काही महत्त्वाची विधाने केली. त्या म्हणाल्या, ""मराठी भाषेच्या संशोधनात भाषाशास्त्रज्ञांनी केलेले अनेक घोटाळे निस्तरावे लागत आहेत. "राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा' असे महाराष्ट्राचे वर्णन असलेल्या महाराष्ट्राचा एका लोकगीतात महाराठ असा उल्लेख आहे. राठ म्हणजे कणखर. हा वऱ्हाडी शब्द आहे. वऱ्हाडीची आद्य पूर्व भाषा देशी होती. तिलाच महाराष्ट्री अथवा अपभ्रंश भाषा असे अभ्यासक म्हणतात. या वरून मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडीच्या आद्यभाषेपासून झाली आहे. याचे अनेक पुरावे महानुभव वाङ्‌मयात सापडतात. साहित्यनिर्मितीने भाषेला स्थिरता येते. अनेक शिलालेख व त्यावरील उल्लेखांवरून हेच पुढे येते. मराठीची व्युत्पत्ती सोपी आहे. आमचे भाषापंडित गावाला वळसा घालत तिचे मूळ शोधण्यासाठी तामिळ भाषेकडे जातात. कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून शोधतात; कारण त्यांना मराठीची व्युत्पत्ती त्याच भाषेत शोधायची असते. मुळात भाषा आधी आणि नंतर भाषाशास्त्र येते. बोली आधी आधी नंतर प्रमाण भाषा येते. ते मानले नाही तर भाषाशास्त्रच शुद्ध वाटायला लागते. हा प्रकार उलटी गंगा नेण्याचा आहे. आम्ही म्हणू तेच खरे असे बिंबवण्याचा आहे.''

उद्‌घाटक श्री. जगदाळे म्हणाले, ""मी ज्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलो. त्या आणि माझ्या सर्व नातलगांच्या आयुष्याचा मी भौतिक दृष्टीने विचार करतो; तेव्हा मला अनेक फरकाचे मुद्दे आढळतात. विचारांची कास धरली तरच स्वतःमध्ये बदल होतो. जागतिकीकरणाच्या परिस्थितीत आपल्याला ती गती पकडावी लागेल. साहित्य विचारांची प्रक्रिया गतिमान करते, असे आपण मानत असू तर या बदलाचे प्रतिबिंब साहित्यात हवे. आपल्याला ती गती पकडावीच लागेल. इंडिया आणि भारत हा फरक वाढतो आहे. तो दूर करणारा विचार साहित्याने द्यावा. नावेशिवाय पाण्यातला प्रवास नाही; मात्र पाणी नावेत आले तर प्रवासच नाही. याच सूत्राने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे पहायला हवे.''

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष साहेबराव खंदारे म्हणाले, ""आम्ही सर्व साहित्यप्रवाहांचे स्वागत करतो. मराठा या शब्दाकडे आम्ही संकुचित भावनेने बघत नाही. विविध जातीसमूहांना त्यांच्या व्यवसायाने जात चिकटली. ती चिकटण्याआधी ते कोण होते? ते मरहट्ट प्रातांत राहत होते. म्हणून ते सारे मराठा होते. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीतील अनेक ठेव्यांचे जतन करण्याची परिषदेची भूमिका आहे. संस्कृतीचे भान ठेवण्याचा आणि ध्यान देण्याचा हा प्रयत्न आहे.''

राजारामबापू सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत, जगद्‌गुरू तुकोराय साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धुमाळ यांनी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून दिला. छत्रपती संभाजीमहाराज (लेखक श्रीमंत कोकाटे), लोकराजे शिवराय, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, थोडं खाजवा की (पुरुषोत्तम खेडेकर), थर्ड आय (ब्रिगेडियर सुधीर सावंत), कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती (सीताराम काकडे), संशोधन बाबूराव टोंगे, माझे बाबा (अप्पासाहेब मगर) या पुस्तकांचे प्रकाशन झाले. सहाव्या संमेलनाचे अध्यक्ष जैमिनी कडू यांनी नव्या अध्यक्षांकडे पदाची सूत्रे दिली.
जिजाऊ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. मंचावर माजी आमदार एकनाथ साळवे, मोहनराव कदम, महापौर नितीन सावगावे, प्रवीण गायकवाड, जिजाऊ बिग्रेडच्या सीमा ढवळे आदींची उपस्थिती होती. नितीन चव्हाण, अर्चना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. पवार यांनी आभार मानले. साहित्य परिषदेचे पदाधिकारी अपर्णा खांडेकर, ऋजुता माने, नामदेव भोसले, शुभांगी पाटील, तानाजीराव मोरे, अशोकराव सावंत, बाळासाहेब सावंत, ए. डी. पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सुभाष सावंत, काका हलवाई, डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते संमेलनाच्या संयोजनात व्यस्त आहेत.

क्षणचित्रे
0 शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा परिसर महापुरुषांच्या प्रतिमांनी सजून गेला आहे.
0संमेलनस्थळी विचारपीठांना क्रांतिसिंह नाना पाटील, महात्मा चार्वाक, महात्मा फुले यांची नावे देण्यात आली आहेत.
0निमंत्रित महिला व पुरुष अशा सर्वांनीच केशरी फेटे परिधान केले होते.
0संमेलनाध्यक्ष प्रतिमा इंगोले यांनी फेट्यासह अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले.
0जोराच्या पावसामुळे पुस्तक विक्रेत्यांची त्रेधा उडाली.
0संमेलनाच्या मार्गावर महाराष्ट्रातील थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
0पुरोगामी विचारांच्या लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध आहेत.


खुल्या काव्यसंमेलनात उमटला स्वाभिमान आणि उद्रेक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - शब्दा-शब्दांतून जाणवणारा उद्रेक, स्वाभिमान, वास्तवावर बोट ठेवणाऱ्या कविता आणि गुलाबी थंडीत उत्स्फूर्त दाद देणारे रसिक यांमुळे सातव्या मराठा साहित्य संमेलनातील खुले कविसंमेलन रात्री उशिरापर्यंत रंगले. दहा वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या ज्येष्ठ कवींनी उत्साहात सहभाग घेतला.
कोल्हापूरच्या कवयित्री मंदा कदम अध्यक्षस्थानी होत्या.

संमेलनात ज्येष्ठ-नवोदित मिळून 65 कवींनी भाग घेतला. विद्रोह, शेती, माती, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, एकात्मता, मानवता, जाती-जातींवरचे राजकारण, भ्रष्टाचार आदी विषयांवर कविता सादर झाल्या. काहींच्या कवितेतून शिवरायांच्या कार्याचा गुणगौरव झाला. काहींनी पोवाडा सादर केला तर प्रेम आणि विनोदी ढंगाच्या काव्यरचनांनी रंगत आणली.

""बाप बाप असतो,
घराचा खांब असतो,
वरवर दिसणाऱ्या पाषणातील,
तो खळाळणारा झरा असतो''
या नितीन माळी यांच्या रचनेस जोरदार दाद मिळाली.

""दोन नंबरच्या धंद्याशिवाय,
सध्या काय चालत नाही,
आता दोन दाबल्याशिवाय
फोनसुद्धा लागत नाही''
ही भानुदास आंबी यांची कविता दाद घेऊन गेली.

अभिजित पाटील यांच्या "मोबाईल' या विनोदी कवितेने खळखळून हसवले.

""अन्यायाने वाकणार नाही,
आभाळाची साथ आहे,
मोडेन; पण वाकणार नाही,
ही मराठ्यांची जात आहे''
ही कविता श्रीधर पाटील यांनी तर

""माणूस आता व्हा रे,
जात नावाची कात टाकूनी,
माणुसकीकडे या रे''
या महेश माने यांच्या कवितेने जाती-जातींमधील राजकारणाचा वेध घेतला.

कविसंमेलनाध्यक्ष मंदा कदम यांनी महाराष्ट्राचा कार्यगौरव व इतिहास सांगणारी तसेच प्रतीकात्मक पाऊस कविता सादर केली.

70 वर्षांच्या ज्येष्ठ कवयित्री गुणवंती हिंगमिरे यांच्या पहाडी आवाजातील शिवरायांच्या पोवाड्यास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. संमेलनात जुन्नरचे शिवाजी चाळक (दिगंबर), प्रा. दिलीप चौधरी (बराक ओबामा), चंद्रपूरचे प्रशांत गोखरे (शिवधर्म), उस्मानाबादचे विक्रम साठे-पाटील (माय), बबन पालसांडे (शिवराय आजीमाय), रामराव मोडे (शिक्षणाच्या आयचा घो), एकनाथ गायकवाड, सूरज मालकर (कवी), वृषभ आकिवाटे (भय), अण्णासाहेब वाठारे (हुकमी एक्का), किरण शिंदे (माझा प्रश्‍न), शामराव मोरे (वैफल्यग्रस्त) यांच्या कवितांना दाद मिळाली.

सांगली - सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. भव्य डिजिटल फलक आणि महापुरुषांच्या प्रतिमांनी संमेलनस्थळाकडे जाणारा मार्ग सजला आहे. मुख्य विचार मंचाजवळच पुस्तकांचे स्टॉल मांडले आहेत.

संपूर्ण संमेलनस्थळाचे "क्षात्रवीर संभाजीराजे नगरी' असे नामकरण करण्यात आले. भाषाप्रभू संभाजीराजांची नव्याने ओळख करून देणारा भव्य पुतळा संमेलनस्थळी उभारण्यात आला आहे. एका हाती तळपती तलवार आणि दुसऱ्या हाती ग्रंथ घेतलेली ही मूर्ती परिसरात पाऊल ठेवताच संमेलनाचे वेगळेपण दाखवून देते. संमेलन मार्गावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, क्रातिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील अशा विभूतींच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. भगव्या ध्वज व पताका सभोवती लावल्या आहेत.

मुख्य मंचाला क्रांतिसिंह नाना पाटील याचे नाव देण्यात आले आहे. सभागृहाला "चार्वाक' यांचे नाव देण्यात आले आहे.

मुख्य विचारमंचाशेजारी पुस्तकांचे स्टॉल्स सजले आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रभरातील पुरोगामी विचारांच्या प्रकाशन संस्थांचे येथे स्टॉल्स आहे. एरवीच्या ग्रंथप्रदर्शनापेक्षा येथे वेगळेपण हे की अनेक लेखकांनी स्वतःचे स्टॉल्स मांडले आहेत. सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वाचकांची मोठी गर्दी येथे होती. सुमारे दोन हजारांवर निमंत्रितांची नोंदणी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.

मुख्य विचारपीठाजवळ दीपमाळ उभी करण्यात आली होती. केळीच्या खुंटावर कच्ची केळी वापरून केलेली ही दीपमाळ कल्पक होती. शेजारीच पुरोगामी विचारांच्या पुस्तकांच्या प्लायवूडमधील प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या. कलाविश्‍व महाविद्यालयातील प्रा. लोहार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विचारपीठाच्या एका कोपऱ्यात प्लायवूडची दीपमाळ उभारली होती. उद्‌घाटक शहाजीराव जगदाळे यांनी ही इलेक्‍ट्रीक दीपमाळ कळ दाबून प्रज्वलित केली.
शांतिनिकेतनच्या सुंदर परिसरात पाहुण्यांची संयोजकांनी चांगली सरबराई केली होती. सकाळी नास्त्याला शिरा होता. दुपारी पुरी श्रीखंडाचा मेनू होता. मातोश्री बयाबाई कदम यांचे भोजनकक्षाला नावे देण्यात आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून परिसर सजवला होता.

आज संमेलनात :
0 सकाळी 8. : मनोरंजनातून प्रबोधन कार्यक्रम. दुर्ग्या देवर्षी नाटिका, तुकाराम महाराज यांच्या जीवनावर पोवाडा, जिजाऊ यांच्यावर एकपात्री प्रयोग, लावणी.
0 सकाळी 9 . परिसंवाद : "बालकुमारांचे साहित्य : निर्मिती व स्वरूप' अध्यक्ष : डॉ. जे. बी. शिंदे. सहभाग : सुरेश सावंत, दिलीप सोळंकी.
0 दुपारी 12 परिसंवाद : "संत तुकारामांचे कालातीत साहित्य' अध्यक्ष : अशोक राणा. वक्ते : गंगाधर बनबरे.
0 दुपारी 12 वाजता परिसंवाद : लोकसाहित्यातील स्त्री. अध्यक्षा : प्रा. शोभना रैनाक. सहभाग : प्रा. कल्पना नागापुरे, डॉ. निर्मला पाटील.
0 दुपारी 2.30 वाजता प्रकट मुलाखत : प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील. मुलाखतकार : डॉ. मोहन पाटील.
0 दुपारी 4.30. वाजता समारोप सत्र. अध्यक्षीय भाषण : डॉ. प्रतिमा इंगोले. समारोपीय भाषण : मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर. उपस्थिती : गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सुधीर सावंत.
0 स्थळ : छात्रवीर संभाजीराजे साहित्य नगरी (शांतीनिकेतन परिसर)

मराठा संमेलनासाठी क्षात्रवीर संभाजीराजेनगरी सज्ज
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 12, 2010 AT 12:33 AM (IST)

सांगली - जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने उद्यापासून सुरू होणाऱ्या सातव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनासाठी छात्रवीर संभाजीराजे साहित्यनगरी सज्ज झाली आहे. उद्या (ता. 12) वाटेगाव येथे अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मस्थळापासून साहित्य दिंडीला प्रारंभ होईल.

देशाच्या विविध भागांतून तीन हजारांवर साहित्यरसिक उपस्थित राहतील. संमेलनासाठी उभारलेल्या विचारपीठावर जगद्‌गुरू तुकोबाराय तसेच छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रतिमा असतील. दीड हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी भव्य बैठक व्यवस्था तसेच साहित्यिक व बाहेरच्या रसिकांसाठी राहणे-भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवस रंगणाऱ्या या विचारमंथनात विविध विषयांवर सहा परिसंवाद, दोन कविसंमेलने, बालरसिकांसाठी कार्यक्रम असणार आहेत. रविवारी (ता. 14) सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील लोककलावंतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यात अंधश्रद्धेवर आधारित "दुर्ग्या देवर्षी' ही नाटिका, तुकोबाराय यांच्या जीवनावर आधारित पोवाडा, लावणी, राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग असे भरगच्च कार्यक्रम आहेत. संमेलनस्थळी दोन भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी पताकांनी ग्रंथदिंडीच्या मार्गाची सजावट सुरू आहे. 40 बाय 20 फूट आकाराचे भव्य व्यासपीठ सजवण्यात आले आहे. त्यावर तुकाराममहाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रतिमा आहेत.

संमेलनस्थळी संभाजीमहाराजांच्या 9 फूट उंचीच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चंद्रपूरचे माजी आमदार एकनाथ साळवे यांच्या हस्ते झाले. भव्य दीपमाळ, कारंज्याने शांतिनिकेतनचा परिसर सजला आहे. उद्या येथे देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या प्रतिनिधी व साहित्यिकांचे आगमन होणार आहे. संमेलनासाठी शहर सज्ज झाले आहे. संमेलनस्थळी मंडप सजावटीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. साहित्य संमेलनाच्या प्रचारासाठी जिल्हाभर फिरलेल्या प्रचाररथांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. प्रत्येक तालुक्‍यातील गावांत जाऊन तेथे संमेलनाचे स्वरूप व परिवर्तवादी विचारांचा प्रसार करण्यात आला. अनेक ठिकाणी रथांचे स्वागत झाले. दरम्यान, उद्या सकाळी साडेदहा वाजता ग्रंथदिंडीला सुरवात होईल. प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत होणार आहे. दुपारी तीन वाजता दिंडी सांगलीत दाखल होईल. त्या नंतर टिळक चौकातून शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून दिंडी संमेलनस्थळी येईल. लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ग्रंथप्रदर्शनाचे 25 स्टॉल सज्ज
संमेलनस्थळाशेजारी असलेल्या जागेत ग्रंथप्रदर्शनासाठी 25 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. परिवर्तनवादी, विद्रोही, बहुजनवादी, दलित साहित्य, अनुवादित प्रकारातील साहित्याचा खजिना वाचकांना उपलब्ध होणार आहे. ग्रंथप्रदर्शन समितीचे बाळासाहेब सावंत म्हणाले, ""संमेलनात दर्दी वाचकांची भूक भागवण्यासाठी विविध प्रकाशनांचे 25 स्टॉल उभारले आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहूमहाराज, महात्मा जोतिबा फुले यांची समग्र ग्रंथसंपदा असेल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या सर्व पुस्तकांचा स्टॉल असेल; त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, नालंदा प्रकाशन, मराठा सेवा संघ प्रकाशन (उस्मानाबाद), मराठा मार्ग (नागपूर), अक्षता प्रकाशन, निरंकारी सत्संग, जनस्वास्थ्य परिवार यांचे स्टॉल असतील. विविध विचारप्रवाहांवर आधारित साहित्याची हजारो पुस्तके या निमित्ताने रसिकांना उपलब्ध होतील.

नवोदित रंगवणार कविसंमेलन
साहित्य संमेलनात दोन कविसंमेलनांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. 12) पहिल्या दिवशी कवयित्री मंदा कदम यांच्या अध्यतेखाली खुले कविसंमेलन रंगणार आहे. रात्री साडेआठ वाजता सुरू होणाऱ्या कविसंमेलनात जिल्ह्यातील नवोदित व उपेक्षित कवी आपल्या कवितेने परिवर्तनाची सुरवात करतील. यात अशा जास्तीत जास्त कवींना संधी देण्यात आली आहे. उपेक्षितांची दु:खे ते मांडणार आहेत. कवी किरण शिंदे व शिवाजी दुर्गाडे सूत्रसंचालन करतील.

2 comments:

Kavita Sagar Diwali Ank 2013 said...

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. सुनील पाटील

जयसिंगपूर - जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रतिथयश साहित्यिक संस्था कवितासागरचे कार्यकारी संचालक, साहित्यिक, संपादक व प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुनील पाटील यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र जे. बी. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले असून सदर नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी दिली.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची विभागीय कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथील संभाजीनगरमध्ये झाली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, समन्वयक गिरीश लक्ष्मण जाधव, विभागीय सचिव राजेंद्र बळवंत यादव यांच्यासह जिल्हा सचिव प्रमोद सुभाष पाटील व अन्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने डॉ. सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकाला प्रथमच कार्याध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे, मराठी वाचकांची वाड्‌.मयीन अभिरुची वृध्दिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उद्दिष्ट ठेवून व्यापक कार्य करण्यासाठी डॉ. सुनील पाटील कार्यरत आहेत.

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे उपेक्षित साहित्य आणि वंचित साहित्यिकांना वाव देण्याचे कार्य केले जाते. मराठा -बहुजन समाजातील नवोदित साहित्यिकांना स्वतंत्र विचारपीठ देणाऱ्या परिषदेकडून अखिल भारतीय पातळीवर साहित्य परिषदेची अनेक साहित्य झाली असून, पुढील साहित्य संमेलने महाराष्ट्राबाहेर तर भविष्यातील काही संमेलने देशाबाहेर भरविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर साहित्य परिषदेचे विचार, कार्य पोचावे हा साहित्य परिषदेचा हेतू असून, मराठा-बहुजन समाजाला साहित्याकडे वळविणे आणि साहित्यिक तयार करणे व त्यासाठी देश, विभाग, जिल्हा, तालुका, गावपातळीवर कार्यशाळा संमेलने घेण्याचे परिषदेच्या कार्याचे स्वरूप आहे, असे डॉ. सुनील पाटील यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल डॉ. सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



छायाचित्र:

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र डॉ. सुनील पाटील यांना देतांना राजेंद्र यादव, जे. बी. शिंदे, डॉ. निर्मला पाटील आदी.

Kavita Sagar Diwali Ank 2013 said...

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. सुनील पाटील

जयसिंगपूर - जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रतिथयश साहित्यिक संस्था कवितासागरचे कार्यकारी संचालक, साहित्यिक, संपादक व प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुनील पाटील यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र जे. बी. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले असून सदर नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी दिली.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची विभागीय कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथील संभाजीनगरमध्ये झाली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, समन्वयक गिरीश लक्ष्मण जाधव, विभागीय सचिव राजेंद्र बळवंत यादव यांच्यासह जिल्हा सचिव प्रमोद सुभाष पाटील व अन्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने डॉ. सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकाला प्रथमच कार्याध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे, मराठी वाचकांची वाड्‌.मयीन अभिरुची वृध्दिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उद्दिष्ट ठेवून व्यापक कार्य करण्यासाठी डॉ. सुनील पाटील कार्यरत आहेत.

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे उपेक्षित साहित्य आणि वंचित साहित्यिकांना वाव देण्याचे कार्य केले जाते. मराठा -बहुजन समाजातील नवोदित साहित्यिकांना स्वतंत्र विचारपीठ देणाऱ्या परिषदेकडून अखिल भारतीय पातळीवर साहित्य परिषदेची अनेक साहित्य झाली असून, पुढील साहित्य संमेलने महाराष्ट्राबाहेर तर भविष्यातील काही संमेलने देशाबाहेर भरविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर साहित्य परिषदेचे विचार, कार्य पोचावे हा साहित्य परिषदेचा हेतू असून, मराठा-बहुजन समाजाला साहित्याकडे वळविणे आणि साहित्यिक तयार करणे व त्यासाठी देश, विभाग, जिल्हा, तालुका, गावपातळीवर कार्यशाळा संमेलने घेण्याचे परिषदेच्या कार्याचे स्वरूप आहे, असे डॉ. सुनील पाटील यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल डॉ. सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



छायाचित्र:

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र डॉ. सुनील पाटील यांना देतांना राजेंद्र यादव, जे. बी. शिंदे, डॉ. निर्मला पाटील आदी.