Saturday, November 13, 2010

अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन . सांगली

'शांतिनिकेतन'मध्ये मराठा साहित्यसंमेलन सुरू...
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 13, 2010 AT 06:09 PM (IST)

सांगली (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा शोध संस्कृत किंवा दक्षिण भाषेच्या घेण्यातून चुकीचा इतिहास प्रचलित झाला. चुकीचे पायंडे पडत गेले, असे मत सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या परिसरात सुरू झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन उद्योजक शहाजीराव जगदाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, प्राचार्य पी. बी. पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

वऱ्हाडी लोकभाषेच्या अभ्यासक डॉ. इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दल काही महत्त्वाची विधाने केली. त्या म्हणाल्या, ""मराठी भाषेच्या संशोधनात भाषाशास्त्रज्ञांनी केलेले अनेक घोटाळे निस्तरावे लागत आहेत. "राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा' असे महाराष्ट्राचे वर्णन असलेल्या महाराष्ट्राचा एका लोकगीतात महाराठ असा उल्लेख आहे. राठ म्हणजे कणखर. हा वऱ्हाडी शब्द आहे. वऱ्हाडीची आद्य पूर्व भाषा देशी होती. तिलाच महाराष्ट्री अथवा अपभ्रंश भाषा असे अभ्यासक म्हणतात. या वरून मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडीच्या आद्यभाषेपासून झाली आहे. याचे अनेक पुरावे महानुभव वाङ्‌मयात सापडतात. साहित्यनिर्मितीने भाषेला स्थिरता येते. अनेक शिलालेख व त्यावरील उल्लेखांवरून हेच पुढे येते. मराठीची व्युत्पत्ती सोपी आहे. आमचे भाषापंडित गावाला वळसा घालत तिचे मूळ शोधण्यासाठी तामिळ भाषेकडे जातात. कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून शोधतात; कारण त्यांना मराठीची व्युत्पत्ती त्याच भाषेत शोधायची असते. मुळात भाषा आधी आणि नंतर भाषाशास्त्र येते. बोली आधी आधी नंतर प्रमाण भाषा येते. ते मानले नाही तर भाषाशास्त्रच शुद्ध वाटायला लागते. हा प्रकार उलटी गंगा नेण्याचा आहे. आम्ही म्हणू तेच खरे असे बिंबवण्याचा आहे.''

उद्‌घाटक श्री. जगदाळे म्हणाले, ""मी ज्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलो. त्या आणि माझ्या सर्व नातलगांच्या आयुष्याचा मी भौतिक दृष्टीने विचार करतो; तेव्हा मला अनेक फरकाचे मुद्दे आढळतात. विचारांची कास धरली तरच स्वतःमध्ये बदल होतो. जागतिकीकरणाच्या परिस्थितीत आपल्याला ती गती पकडावी लागेल. साहित्य विचारांची प्रक्रिया गतिमान करते, असे आपण मानत असू तर या बदलाचे प्रतिबिंब साहित्यात हवे. आपल्याला ती गती पकडावीच लागेल. इंडिया आणि भारत हा फरक वाढतो आहे. तो दूर करणारा विचार साहित्याने द्यावा. नावेशिवाय पाण्यातला प्रवास नाही; मात्र पाणी नावेत आले तर प्रवासच नाही. याच सूत्राने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे पहायला हवे.''

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष साहेबराव खंदारे म्हणाले, ""आम्ही सर्व साहित्यप्रवाहांचे स्वागत करतो. मराठा या शब्दाकडे आम्ही संकुचित भावनेने बघत नाही. विविध जातीसमूहांना त्यांच्या व्यवसायाने जात चिकटली. ती चिकटण्याआधी ते कोण होते? ते मरहट्ट प्रातांत राहत होते. म्हणून ते सारे मराठा होते. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीतील अनेक ठेव्यांचे जतन करण्याची परिषदेची भूमिका आहे. संस्कृतीचे भान ठेवण्याचा आणि ध्यान देण्याचा हा प्रयत्न आहे.''

राजारामबापू सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत, जगद्‌गुरू तुकोराय साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धुमाळ यांनी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून दिला. छत्रपती संभाजीमहाराज (लेखक श्रीमंत कोकाटे), लोकराजे शिवराय, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, थोडं खाजवा की (पुरुषोत्तम खेडेकर), थर्ड आय (ब्रिगेडियर सुधीर सावंत), कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती (सीताराम काकडे), संशोधन बाबूराव टोंगे, माझे बाबा (अप्पासाहेब मगर) या पुस्तकांचे प्रकाशन झाले. सहाव्या संमेलनाचे अध्यक्ष जैमिनी कडू यांनी नव्या अध्यक्षांकडे पदाची सूत्रे दिली.
जिजाऊ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. मंचावर माजी आमदार एकनाथ साळवे, मोहनराव कदम, महापौर नितीन सावगावे, प्रवीण गायकवाड, जिजाऊ बिग्रेडच्या सीमा ढवळे आदींची उपस्थिती होती. नितीन चव्हाण, अर्चना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. पवार यांनी आभार मानले. साहित्य परिषदेचे पदाधिकारी अपर्णा खांडेकर, ऋजुता माने, नामदेव भोसले, शुभांगी पाटील, तानाजीराव मोरे, अशोकराव सावंत, बाळासाहेब सावंत, ए. डी. पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सुभाष सावंत, काका हलवाई, डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते संमेलनाच्या संयोजनात व्यस्त आहेत.

क्षणचित्रे
- शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा परिसर महापुरुषांच्या प्रतिमांनी सजून गेला आहे.
- संमेलनस्थळी विचारपीठांना क्रांतिसिंह नाना पाटील, महात्मा चार्वाक, महात्मा फुले यांची नावे देण्यात आली आहेत.
- निमंत्रित महिला व पुरुष अशा सर्वांनीच केशरी फेटे परिधान केले होते.
- संमेलनाध्यक्ष प्रतिमा इंगोले यांनी फेट्यासह अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले.
- जोराच्या पावसामुळे पुस्तक विक्रेत्यांची त्रेधा उडाली.
- संमेलनाच्या मार्गावर महाराष्ट्रातील थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
- पुरोगामी विचारांच्या लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध आहेत.

No comments: