वाचन अभिरूची वाढवण्यानेच मराठय़ांचा विकास -इंगोले | | | |
मराठय़ांचा सर्वागीण विकास वाचन अभिरूची वाढविल्यानेच होणार असून, लेखनयज्ञात सर्व मराठय़ांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन करून अन्यायाविरुद्ध कळीकाळाचे रूप मराठय़ांनाच घ्यावे लागणार असल्याने अभंग विश्वास व एकजुटीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सांगलीतील ७ व्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योगपती शहाजी जगदाळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने ७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभास मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, सांगलीचे महापौर प्रा. नितीन सावगावे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष मोहनराव कदम, एकनाथ सरडे, वसंतराव सोनवणे, प्रा. दिलीप चौधरी, रेखा खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा ढवळे, देवानंदजी कापसे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष जैमिनी कडू यांनी ७ व्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. प्रतिमा इंगोले यांच्याकडे प्रदान केली. प्रारंभी स्वागतगीत, जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उद्घाटक शहाजी जगदाळे यांच्या हस्ते विचारपीठावरील विद्युत दीपस्तंभ कळ दाबून प्रज्वलित करण्यात आला. स्वागताध्यक्ष श्यामराव पाटील यांनी स्वागत केले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी प्रास्ताविकात साहित्य परिषद व साहित्य संमेलनाची भूमिका विशद केली.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यासाठी विचारांची गरज असते. ते विचार मिळविण्यासाठी मराठा साहित्य संमेलनाच्या माध्यमाचीही आवश्यकता आहे. विचारांची कास धरल्याशिवाय जागतिक प्रवाहात प्रगती साधता येणे अशक्य आहे, असे विचार उद्घाटक शहाजी जगदाळे यांनी मांडले.
या साहित्य संमेलनातूनच नवा तुकाराम जन्माला येणार आहे. सांगलीत झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय संमेलनाचे साधे निमंत्रणही मला मिळाले नव्हते, मात्र याच सांगलीत ७ व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले, याचा मला अभिमान वाटतो. बाईनेच का दळायचं? एखाद्या दिवशी नवऱ्याने दळले तर काय बिघडले. शेतकऱ्यांना सर्वानी कष्टाचे मोल म्हणून हातभार लावायला हवा, तरच शेती व्यवसाय टिकू शकेल. तो जर नष्ट झाला तर अन्नधान्याच्या पर्यायी व्यवस्थेचे काय, असा सवाल उपस्थित करून प्रतिमा इंगोले यांनी जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेऊन माणूस तगू शकणार नाही. अन्नब्रम्हाची तृप्ती मिळणार नाही व मानव दानव झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत व्यक्त केली. मराठय़ांचा खरा व्यवसाय शेती हा आहे. मुळातच तो भूदेव, कारण तो अन्न पिकवून सगळ्यांना खाऊ घालतो. पालनपोषणाचे कार्य करतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे, असे प्रतिमा इंगोले यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य संमेलनाची स्मरणिका पेरणी-संपादक जे. बी. शिंदे, कुळवाडी भूषण-सीताराम काकडे, संशोधक-बापूराव ढोंगे, पुराणातील गमतीजमती व वास्तव दर्शन-हिंमतराव मोरे, माझी शाळा-आप्पासाहेब मगर, थोडं खाजवा की, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पुणे लुटणारा व जाळणारा आदिलशहाचा प्रामाणिक नोकर दादोजी कोंडदेव या पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
मराठा साहित्याचे समांतर प्रवाह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, मराठा लोकतत्त्व आणि भाषा, बदलती समाजव्यवस्था-शेतकरी आणि मराठा साहित्य या विषयांवर दिवसभरात परिसवांद पार पडले. यामध्ये चंद्रशेखर शिखरे, टेक्सास गायकवाड, डॉ. रावसाहेब पाटील, वाहरू सोनवणे, प्रा. फक्रुद्दीन बेन्नुरे, डॉ. बाबुराव गुरव, डॉ. नवनाथ मोरे, डॉ. शरद गायकवाड, सदानंद देशमुख, भास्कर चंदनशिव, मनीषा पाटील यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment