Sunday, November 14, 2010

मराठा शब्द प्रांतवाचक; संमेलनाचीही तीच भूमिका
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 12, 2010 AT 12:15 AM (IST)

सांगली - येथे शुक्रवार(ता. 12) पासून तीन दिवस शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या प्रांगणात 7 वे मराठा साहित्य संमेलन होत आहे. जगद्‌गुरू तुकोबाराय परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्रात होणारे हे पहिलेचे संमेलन. त्याच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले यांनी "सकाळ'जवळ मांडलेली व्यापक भूमिका...

छोटी छोटी संमेलने अटळ, अपरिहार्य - प्रतिमा इंगोले
""आपल्या समाजाचे जात वास्तव विचारात घेतले तर मराठा संमेलनासारखी छोटी छोटी संमेलने ही अटळ आणि अपरिहार्य बाब ठरते; मात्र कोणतेही साहित्य समाजाला उन्नतच करते. साहित्याचा मेळा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्हावा. विचारांचे आदान-प्रदान व्हावे. त्यातून सत्य पुढे यावे. मुळात मराठा शब्द जातवाचक नाही. प्रांतवाचक वा प्रवृत्तीवाचक आहे. तीच व्यापक भूमिका जगद्‌गुरू तुकोबाराय परिषदेची आहे. या संमेलनाची भूमिकाही समाजाला पुढे घेऊन जाणारीच राहील.'' असा आशावाद सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी झालेली प्रश्‍नोत्तरे...

प्रश्‍न - जातीच्या संमेलनाची खरेच आवश्‍यकता आहे का?
उत्तर - जातीचे मेळावे होतात. राजकीय मागण्या केल्या जातात. त्याचवेळी जातीच्या नावावर साहित्याचा उत्सव झाला तर समाजविघातक असे काहीच घडणार नाही. लोक एकत्र येतील. चर्चा करतील. साहित्य सर्वांना सोबत घेऊन जाण्याचाच संदेश देते. अनेक बऱ्या-वाईट गोष्टींबाबतची चर्चा होऊन त्यातून संशोधनाला चालना मिळेल. त्यातूनच संस्कृतीचे संवर्धन होत असते. प्रत्येकीला लता मंगेशकरांसारखे गाता येणार नाही; मात्र एखादी गृहिणी चांगले गात असेल आणि तिच्या गाण्यातून कुटुंबाला चार घटका आनंद मिळत असेल तर ते गाणं चांगले नाही का?

प्रश्‍न - अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून इतर विविध संमेलनांशी मराठा संमेलनाचे नाते कोणते?
उत्तर - छोटी संमेलने साहित्यनिर्मितीची ऊर्मी तयार करण्यासाठी पूरकच ठरतात. मुळात मराठा संमेलन हे जातीचे संमेलन आहे, असा समजच चुकीचा आहे; कारण मराठा शब्द जातवाचक नसून प्रांतवाचक, प्रवृत्तीवाचक आहे. मराठा आणि महाराष्ट्राची व्युत्पती शोधताना हे सिद्ध होते. जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची हीच भूमिका आहे. विविध साहित्य प्रवाहांना सोबत घेऊन त्यांचे अस्तित्व मान्य करूनच पुढे जाण्याची परिषदेची भूमिका आहे.

प्रश्‍न - मराठा संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना तुमची भूमिका कोणती आहे?
उत्तर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 84 वर्षांच्या वाटचालीत अवघ्या चार महिलांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. तुकोबाराय साहित्य परिषदेने मात्र सातव्या संमेलनातच एका स्त्रीकडे अध्यक्षपद सोपवले ही बाब मला महत्त्वाची वाटते. अर्थात, मी खूप मोठी साहित्यनिर्मिती केली असा दावा नाही; मात्र मी ज्या वास्तववादी जाणिवेने लिहिते, सामान्यांच्या प्रेरणा व्यक्त करते, त्या सर्व समाजघटकांची प्रतिनिधी म्हणून मला ही संधी दिली असावी. सांगलीच्या 81 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या हस्ते झाले. या संमेलनाला मला निमंत्रण नव्हते. त्याचा मनात किंतू नाही; मात्र साहित्यरसिक म्हणून मी संमेलनाला हजर होते. आता सांगलीत अध्यक्ष म्हणून हजर राहण्याची संधी मिळते तर ती घ्यावी. माझ्यासारख्या अनेकांनी लिहिते व्हावे, या हेतूने मी या संमेलनाला उपस्थित राहते आहे.

प्रश्‍न - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दलचे संशोधन आपण पुढे आणले आहे. त्या बद्दल सांगा?
उत्तर - संस्कृतपासून मराठीची व्युत्पत्ती झाल्याचे मानल्याने आजवर अनेक गोंधळ झाले. त्यामुळे अनेक मराठी शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी दक्षिणेतील भाषांकडे जावे लागते. माझ्या मते हा अट्टहास सोडला पाहिजे. त्यातून चुकीचे पायंडे पडत गेले. देशी भाषांचे अस्तित्व शोधताना आपल्याला अनेक शब्दांची उकल होत जाते. महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती शोधताना अकराव्या शतकात चक्रधरांच्या महानुभव ग्रंथातील उल्लेखापर्यंत आपण पोहोचतो. तिथे महाराष्ट्री असा उल्लेख आहे; मात्र महाराठ शब्दापासून महाराष्ट्री शब्द आल्याचे दिसते. महानुभवाच्या आधी शंभर वर्षे महाराठ हा शब्द वऱ्हाडात प्रचलित होता. राठ म्हणजे कठीण, महाराष्ट्र भूमी कठीण दगडांची म्हणून महाराठ शब्द आला. महाराठ प्रांतातील सारेच मराठा. देशी भाषांच्या संशोधनातून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. लोकभाषांना तुच्छ लेखण्याचे अनेक दुष्परिणाम संशोधनातून सिद्ध झाले आहेत. अध्यक्षीय भाषणात मी याचा सविस्तर उल्लेख केला आहे.

No comments: