Monday, November 15, 2010

संमेलनातील ठराव

संमेलनातील ठराव
0 लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवा
0 कर्नाटकसह सर्व राज्यांतील सीमावाद तातडीने सोडवा
0 राज्यात होणाऱ्या सर्व साहित्य संमेलनांना अनुदान द्या
0 साहित्यिकांना समाज पायाभूत धरून गौरवावे
0 बेंद्रे लिखित "विचिकित्सक शिवकालाच्या इतिहास' ग्रंथ-खंडाचे पुनःप्रकाशन व्हावे
0 शासकीय आदेश लोकभाषेत प्रकाशित व्हावीत

मराठा समाजाला आरक्षण द्यावे
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:15 AM (IST)

सांगली, (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करणारा ठराव आज येथे सातव्या मराठा साहित्य संमेलनात संमत करण्यात आला. दोन दिवसांच्या संमेलनाच्या समारोप सत्रात विविध ठराव करण्यात आले. मराठा साहित्यकांनी समाजाला पुढे नेणारे साहित्य निर्माण करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. समारोप सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संघाच्या वाटचालीबाबत दिशादिग्दर्शन केले.

ते म्हणाले,""मराठा शूद्रच आहेत. त्यांची वाटचाल अतिशूद्रतेकडे सुरू आहे. अशा संमेलनातून मराठा समाजाला दिशा देणारे साहित्य पुढे यावे. नकाराचे नव्हे तर विद्रोहाचे साहित्य यावे. मराठा समाजातल्या शिकलेल्यांना समज यावी, यासाठीच सेवा संघाची धडपड आहे. आम्ही ब्राह्मणविरोधी बोलतो असे आजवर म्हटले जायचे. मात्र, या म्हणण्याला एकाही ब्राह्मणाचा आक्षेप नाही. आमच्यावर टीका करणारे सर्व आमचेच आहेत. प्रश्‍न आमच्या विरोधाचा नाही. तर, आम्ही काय चुकीचे बोलतो? याचा आहे.''

माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले,""मराठा समाजाने आत्मचिंतन करून वाटचाल करावी. कमी शिक्षणप्रसार, अंधश्रद्धाळूपणा, व्यसनांधता ही समाजापुढची आव्हाने आहेत. स्त्रियांना उबंरठ्याबाहेर आणून त्यांच्या हाती आर्थिक सूत्रे देण्यासाठी समाजाने पाऊल टाकावे.''

संमेलनाध्यक्षा प्रतिमा इंगोले म्हणाल्या,""सूर्याच्याही पुढे जाणारे सत्य शोधण्यासाठी मराठा समाजाने पुढे यावे. साहित्य उन्नतीकडे नेते. तसे लेखन करण्यासाठी सेवा संघाच्या माध्यामातून प्रयत्न व्हावेत.''

व्यासपीठावर साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रमुख निर्मला पाटील, शामराव पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे उपस्थित होते. अपर्णा खांडेकर यांनी आभार मानले।

ब्राह्मणांनो, आता माणसात या
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - सत्ता, संपत्ती आणि विद्येचा अधिकार केवळ ब्राह्मणांना आणि कष्ट व सेवा क्षुद्रांनी करायची, असा विचार मांडणाऱ्या द्विवर्णवादी ब्राह्मणांनो, आता माणसांत या. जन्माधिष्ठित उच्च-निच्चतेची वागणूक चुकीची आहे हे एकदाचे जाहीर करा. गुणधर्मावर आधारित समाज उभा करूया, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी आज येथे केले. येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या सातव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनात डॉ. मोहन पाटील यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात त्यांनी शांतिनिकेतनची उभारणी, जमिनी खरेदी, आमदारकीचे तिकीट, बदलते शैक्षणिक धोरण, समाजवाद यावर परखड मते व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी येथे जानेवारीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशनाच्या आयोजकांना उद्देशून त्यांना माणसांत येण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, ""राज्यात अनेक प्रकारची साहित्य संमेलने कशासाठी, असा प्रश्‍न काही ठिकाणी उपस्थित केला जातो. आम्हाला तर कुठे हवी आहेत ती. एकच झाले तर नकार कुणाचा आहे. पण, आधी जातीची उतरंड खाली आणा. ती अजून घट्ट आहे. त्याने ब्राह्मणेतरांची तोंडे झाकली आहेत. सर्वांत वर बसलेलं ब्राह्मणरूपी बुंडुकल खाली यायचं नाव घेत नाही. त्यांनी खाली यावं, सर्वांनी आपापल्या आकारानुसार पंगत करावी. गुणधर्मावर आधारित समाज उभा करण्याची प्रक्रिया सुरू करूया. त्यासाठी अमानुष वर्णवाद सोडला पाहिजे. सत्ता, विद्या, संपत्ती आणि श्रमाचे सार्वत्रिकरण आणि विकेंद्रीकरण हाच खरा समाजवाद आहे.''

ते म्हणाले,""शैक्षणिक पद्धती अतिशय वाईट दिशेने निघाली आहे. ना शिकणारा पूर्णवेळ आहे ना शिकवणारा. प्राध्यापक कामगार आणि संस्थाचालक मालक झाले आहेत. येथे सारा होलसेल-रिटेलचा बाजार मांडला आहे.''

ते राजकारणच होते
शांतिनिकेतन मोडण्यासाठीही अनेकांनी प्रयत्न केले. वसंतदादांनी मला आमदारकीचे तिकीट दिल्याने त्यांचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी प्राध्यापकांच्या सहाय्याने तो डाव रचला. पदवीचे शिक्षण देणारा विभाग बंद करावा लागला. शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. हे एक प्रकारचे राजकारणच होते.''

प्राचार्य म्हणाले...
* मराठ्यांनी व्हिजन ठरवावं
* व्हिजनप्रमाणे नियोजन व्हावं
* भारतीय राज्यघटनेचा विसर पडलाय
* भारतीय राज्यपद्धती ब्रिटिशकालीन
* पहिलीपासून इंग्रजी नको
* आधी मातृभाषा पक्की करा
* शिक्षणशास्त्राप्रमाणे मुलांचे संगोपनशास्त्र शिका
* शांतिनिकेतनची जागा कष्टाने मिळवली
* नगरपालिकेने गॅझेट करूनही 50 एकर जागा दिली नाही


मराठा संमेलनात रंगले "मनोरंजनातून प्रबोधन'
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - अंधश्रद्धेतून होणाऱ्या फसवणुकीचे उच्चाटन करणारी नाटिका, तुकाराम महाराजांचा पोवाडा, संभाजीराजे यांची शौर्यगाथा, अण्णा भाऊ साठे यांची लावणी व जिजाऊ यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोगाने सातव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनातील सकाळचे सत्र रंगले. "मनोरंजनातून प्रबोधन' कार्यक्रमात जिल्ह्यातील कलाकारांनी विविध लोककलांच्या दर्शनातून खळखळून तर हासवलेच पण तितकेच अंतर्मुखही केले.

नागठाणे (ता. पलूस) येथील बालगंधर्व सांस्कृतिक मंचने सादर केलेली "दुर्ग्या देवर्षी' नाटिकेने रसिकांना खळखळून तर हासवलेच पण फसवणुकीला बळी न पडण्याचा संदेश दिला. भोंदूबाबा अंगात आणण्याचे कसे नाटक करून देवीच्या नावाखाली कसे सर्वसामान्यांना लुटतो. त्याची भोंदूगिरी व फसवणूक अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिस सापळा रचून कसे हाणून पाडतात हे दाखवले. लोकांनी कसल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन या नाटिकेतून करण्यात आले.

अरुण कापसे यांनी लेखन व दिग्दर्शन केले, तर राजेंद्र जाधव, बाळकृष्ण फार्णे, जितेंद्र जाधव, सोमनाथ बामणे, अनिल पखाले यांनी अभिनय केला. शाहीर राजा पाटील यांनी "तुका वैकुंठाला जातो का?' हा पोवाडा सादर केला. तुकोबा वैकुंठाला गेले नाहीत तर देहूगावातील ब्राह्मणांनी त्यांची हत्या केल्याचे त्यांनी पोवाड्यातून सांगितले. विक्रम शिरतोडे याने "माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली' या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लावणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्नेहा कदम यांनी एकपात्री प्रयोगातून राजमाता जिजाऊ यांचे चरित्र उलगडले. जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक धकाधकीचे प्रसंग, त्यांची राज्य स्थापण्याची आकांक्षा, शिवाजीराजेंना घडवणे, मोगलाईच्या काळातील जिजाबाई यांची मानसिकता दाखवली. वरद महिला भजी मंडळाने तुकोबांची भजने सादर केली. स्नेहल लवंड हिने छात्रवीर संभाजीराजे यांची जीवनगाथा, कर्तृत्वगाथा सांगणारे विचार सांगितले.

No comments: