Monday, November 9, 2009

तुकारामांचा विचार समाजाला कळला पाहिजे -शिवराज महाराज
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नागपूर, २३ मे / प्रतिनिधी

सर्व संतांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान स्वीकारले असून बुद्धाच्या विचारांचा कळस तुकारामांच्या


विचारात दिसून येतो. म्हणूनच तुकोबारायांचा विचार समाजाला कळला पाहिजे, अशी कळकळ पंढरपूरच कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी हे होते.
याप्रसंगी शिवराज महाराज यांनी हिंदूू धर्मातील अनिष्ठ प्रथा-परंपरा, अंधश्रद्धांवर कठोर टीका करून संत तुकारामांचा डोळस विचार स्वीकारण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा नेहमीच प्रथा-परंपरांना बळी पडलेला आहे. त्यामुळे तो अजूनही गाफिल आहे. हिंदू धर्मातील भाकडकथांना संतांनी विरोध केला. पण, अजूनही समाजाचे डोळे उघडत नाहीत. लोकांना ज्ञानेश्वर चालत नाही पण, व्यास चालतो. यामागची कारणमीमांसा मात्र त्यांना माहित नसते. आनंद यादवांनी तुकोबांविरुद्ध लिहिले तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला. त्यावर मोठा गजहब झाला. अशीच टीका यादवांनी संत ज्ञानेश्वरांवरही केली आहे पण, ते पुस्तक कुठे गायब झाले, याचा पत्ताही लागला नाही. कल्पनेप्रमाणे वाहत जाणारे साहित्य समाजाला नको आहे तर समाजाचे खरे चित्रण करणारे साहित्य हवे आहे. तुकोबांनी पोटाकरिता धर्म सांगणाऱ्यांवर प्रहार केला पण, तुकोबाराय समाजाला कळले नाहीत. त्यांचा विचार पुढे नेताना विरोध करणाऱ्याचे तोंड बंद करण्याची हिंमत मराठय़ांनी दाखवली पाहिजे. त्यासाठी मराठय़ांनी एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन शिवराज महाराज यांनी केले. यावेळी शिवराज महाराज यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी चवथ्या मराठा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी सुधाकर गायधनी यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे तसेच ना.गो. थुटे, प्रा. अशोक राणा, डॉ. दिलीप धापके यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
विचारमंचावर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर सहआयुक्त पल्लवी दराडे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, इतिहासकार मा.म. देशमुख, सुमती धनवटे, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, प्रदेश सचिव विजय ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री शेळके, रेव्हरंड नितीन सरदार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, पुरुषोत्तम कडू, प्रशांत कोहळे, अनंत सोमदे हे उपस्थित होते. संचालन लीना निकम आणि विजया मारोतकर यांनी केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जिजाऊ वंदना विजया कोकाटे यांनी सादर केली. प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
खास शिवकालीन परंपरेनुसार तुतारी वाजवून समारंभाला प्रारंभ झाला.
सिंदखेड राजा येथील जिजाऊ शिवसृष्टीसाठी मराठा सेवा संघ नागपूर शाखेतर्फे मधुकर मेहकरे यांनी अकरा लाख रुपयांचा लाखांचा धनादेश पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुपूर्द केला.
यावेळी यंदा आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली शीतल उगले हिचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके येणार म्हणून दिवसभर चर्चा होती पण, ते आले नाहीत. कुलगुरू श.नू. पठाणही हजर नव्हते.
शिवराज महाराज यांनी श्रोत्यांची नस पकडून मिश्किल पण, आग्रही शैलीत भाषण केल्याने त्यांना मोठा प्रतिसाद लाभला.
उद्घाटनच उशिरा झाल्याने अन्य कार्यक्रमांनाही उशिरा सुरुवात झाली. मराठा समाजाच्या वकुबाला शोभेलशी अपेक्षित गर्दी संमेलनाला होऊ शकली नाही.

No comments: