Monday, November 9, 2009

मराठा आरक्षणासाठी बहुजनांनी सक्रिय सहभागी होण्याची गरज
मराठा सेवा संघप्रणित पाचवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे शनिवारी



नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांच्या अध्यक्षीय भाषणाचे संपादित अंश.
पाचवे अ.भा. मराठा साहित्य संमेलन, नागपूर येथे आयोजित करून आपण फार मोठे औचित्य साधले आहे. आपण संमेलनाच्या आवतणात म्हटल्याप्रमाणे, ‘मराठीतील पहिल्या नागवंशीय मानवाच्या साहित्याची आठवण ठेवणे खरोखरच अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राला मराठी भाषा आणि मराठी वाड्:मय याची जाण आणि भान विदर्भातल्या नागभूमीने करून देऊन विश्वापुढे एक अलौकिक जीवनयात्रा म्हणून साहित्याचा प्रक्षेप उभा केला आहे. हेच वैश्विक मराठा साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे सूत्र आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर, अखिल विश्वात जेथे जेथे म्हणून मराठा माणूस पोहोचत आहे, त्यांच्या संबंधाचा आलेख हा परंपरा आणि वर्तमान यांना साधणाऱ्या वाड्:मयाचा प्रवास करतो. याच भूमिकेतून या संमेलनाचे आयोजन केले आहे.
संत शिरोमणी तुकोबारायांचा विषय निघाला की, गाथेचे तरंगणे आणि वैकुंठगमन हे मुद्दे आलेच. गाथेचा इतिहास आपणास ठाऊकच आहे. तुकोबारायांचा सखा आणि टाळकरी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या अथक प्रयत्नामुळे गाथा पुन:निर्मित झाली.
बरे झालो देवा कुणबी झालो
अन्यथा असतो दंभे मेलो
कुणबी म्हणजे शेतात सहकुटुंब राबराब राबून तिथेच घर-झोपडं बांधून जीवन कंठणारा अन्नदाता, अर्थात, शेतकरी इतका व्यापक अर्थाने कुणब्याचा अर्थ विस्तारतो. ‘कुणब्यासारखा दाता नाही’ म्हणतात पण, आज हाच अन्नदाता अन्नान्न स्थितीत आलेला आहे. असो आता इथे आपला मुद्दा संत तुकोबांच्या वैकुंठगमनाचा आहे. आजही महाराष्ट्राच्या विद्यापीठांमध्ये शालेय अभ्यासक्रमांमध्ये महाराजांचे वैकुंठगमन झाल्याचेच शिकविले जात आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारकरीवर्ग भक्तिभावनेतून वैकुंठगमनाच्या बाजूने असला म्हणून हे सत्य इंद्रायणीच्या डोहातच तळमळत ठेवणे कितपत योग्य?
आज मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने याचा नीट अभ्यासपूर्ण लेखाजोखा आपणास मांडावयाचा आहे. मराठा हा स्वराज्यासाठी लढत राहिलेला समाज आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा आदर करतो. त्यांना अन् त्यांच्या वारसदारांना अनेक सवलतींचा लाभ देतो, मग हाच निकष स्वराज्यासाठी लढणाऱ्या मराठय़ांसाठी का नाही? मराठा संज्ञेत त्यावेळी मोडणाऱ्या अठरापगड जातींपैकी अनेक जाती-जमातींना सवलतींचा लाभ झालेला आहे. आज खुद्द विदर्भ-नागपूरकडील मराठय़ांची दुरावस्था कशी आहे, हे आरक्षण विरोधकांना ठाऊक आहे का? इथे राजे शिर्के सायकलच्या पंक्चरचं दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. पुण्या-मुंबईकडे शेकडोंनी मराठा बांधव माथाडी हमालाचे आणि रिक्षाचालकाचे काम करतात. दीड टक्के मराठा लोक राज्यकर्ते झाले म्हणून उर्वरित लोकही पुढारले, असे म्हणणे हा कुठला युक्तिवाद? अकारण मराठय़ांच्या छातीत अंगार अन् मेंदूत वर्णवर्चस्वाचा पोकळ अहंकार आजवर भरवण्यात आला. आता कुठे मराठा सेवा संघाच्या प्रयत्नाने हे कोडं मोकळं होऊ लागलं आहे पण, मराठा आरक्षण परिषदेतही भाऊबंदकी सुरू होताना दिसते, हे क्लेशदायक आहे.
शेतकरी-कष्टकरी मराठा, आज आरक्षणप्राप्त जाती-जमातींच्या तुलनेत माघारलेला आहे. राजकारणी मराठय़ांना मागासवर्गात मोडणं आवडत नाही. ज्यांना समाजाचं मागासलेपण मान्य नाही, त्यांनी वाटल्यास आरक्षणाचा लाभ न घ्यावा पण, म्हणून इतरांच्या तोंडाचा घास हिसकू नये. कुणबी समाज ओबीसी असून मराठय़ांच्या आरक्षणासाठी पुढे आला. त्यामध्ये इतर बंधू बहुजनांनीही सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे.
शेतकरी हा बहुजन वर्गातलाच, आज शिवाजी राजे असते तर कदाचित एकाही किसानाची आत्महत्या झाली नसती. शेतकऱ्यांविषयी छत्रपती शिवरायांना अपार आस्था होती. त्यांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली होती. अशी ती तेव्हाची शिवशाही आणि अशी ही आजची लोकशाही! पण, आम्हा कास्तकारांना आज पुढारीही जोशीच निवडावा लागला. यापेक्षा विरोधाभास तो कोणता? ‘शिवधर्म’ नावाची जी धर्मक्रांती मराठा सेवा संघाने घडवून आणली, त्या क्रांतीची तुलना धम्मक्रांतीशी होऊ शकेल एवढय़ा मोलाचे ते कार्य आहे. शिवधर्माच्या प्रचारासाठी आता त्यागी आणि अभ्यासू प्रवक्ते आणि संघटकांची गरज आहे.
यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नांमुळे साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती झाली. यावर बहुजनांमधून किती लेखक-कवी अध्यक्ष किंवा सदस्यसपदी गेले? आमचेच राज्यकर्ते अखेर कुणाचे पाय धुऊन तीर्थ पितात? मंडळाच्या वर्तमान अध्यक्षांना विदर्भ आठवत नाही. ते पूर्ण महामंडळ कोकणात गाजवतात आणि आमच्या ठाले पाटलांच्या नावे बोटे मोडतात. कारण काय, तर त्यांनी अमेरिकेत पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेऊन ते यशस्वी केले. महाबळेश्वर संमेलनाचे अध्यक्ष आमचेच डॉ. आनंद यादव यांनी संतसूर्य तुकारामांबद्दल क्षमा मागून ग्रंथ मागे घेतला. ग्रंथ कसा काय मागे घेतला जातो, हे मला कळत नाही.
अलीकडे या देशात चर्चसारख्या शांत प्रार्थनामंदिरांवर धर्माध शक्तींकडून जे हल्ले होत आहे, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाला माणूसपण शिकविले, त्याला क्रुसावर निष्ठुरपणे ठोकणाऱ्या मारेकऱ्यांना त्याने माफ केले. असा महाकारुणिक महापुरुष, त्याच्याच प्रार्थनाघरांवर हे नादान हल्ले करताहेत, ही मानवी इतिहासात शरमेने मान खाली झुकवणारी घटना आहे. प्रभू येशू याही हल्लेखोरांना माफच करणार आहे पण, त्यांची मने मानवी असतील तर ते अखेर पश्चातापद:ग्ध होतीलच.
जय जिजाऊ

No comments: