Monday, November 9, 2009

मराठा साहित्य संमेलन २३ पासून
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 07th, 2009 AT 10:05 PM
नागपूर - मराठा सेवा संघ प्रणित जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे पाचवे मराठा साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक विजयकुमार शिंदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार,(ता.22) सायंकाळी 6 वाजता महाराजबाग येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळयापासून जगद्‌गुरू तुकोबाराय चतुर्थ जन्मशताब्दीनिमित्त मिरवणूक व ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचा समारोप रात्री 9.30 वाजता डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे होईल.
शनिवार,(ता.23) सकाळी 9 वाजता संमेलनाचे उद्‌घाटन शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सुधाकर गायधनी राहतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, पुरूषोत्तम खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, नेताजी गोरे, विजयकुमार ठुबे, जयश्री शेळके, अंनतदादा चोंदे, देवानंद कापसे, सुनील सरदार, पुरूषोत्तम कडू, मधुकर मेहकरे उपस्थित राहतील.
दुपारी 2 वाजता सार्वकालीक संत तुकाराम महाराज या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5 वाजता साहित्यातील मराठा स्त्री यावर वक्‍ते विचार व्यक्‍त करतील. रात्री 8 वाजता शिवशब्द गजर हे कवीसंमेलन होईल. रविवार, (ता.24) सकाळी 9 वाजता वाचकांच्या साहित्याकडून अपेक्षा तर सकाळी 11 वाजता मराठा साहित्याची भूमीका या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 3 वाजता आमचे जीवनगाणे : शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर आणि शिवमती रेखा खेडेकर यांची प्रगट मुलाखत होईल. सायंकाळी 5 वाजता सुधाकर गायधनी यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सुधाकर मोहोड, प्रशांत कोहळे, अभिजित दळवी आदी उपस्थित होते.

नागपूर - जय शिवाजी व जय जिजाऊचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात असंख्य आकर्षक चित्ररथांचा समावेश असलेल्या मिरवणूक व ग्रंथदिंडीने आज मध्य नागपूर दुमदुमले. मराठा साहित्य समंलेनाच्या पूर्वसंध्येला जगदगुरू तुकोबारायांच्या चतुर्थ जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी काढण्यात आलेल्या या दिंडीत लहानथोरांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
ग्रंथदिंडीची सुरुवात महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून झाली. तत्पूर्वी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी डॉ. देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीची पूजा केली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, विभागीय अध्यक्ष मधुककराव मेहकरे, कॉंग्रेसचे माजी नेते मुकुंदराव पन्नासे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्‍वर रक्षक, रमेश बोरकुटे, चंद्रशेखर चांदेकर, संजय शेंडे, प्रदीप शेंडे, डॉ. शांतिदास लुंगे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी झेंडा चौक (धरमपेठ), लक्ष्मी भवन चौक, शंकरनगर, सिमेंट रोड, रामनगर, गोकुलपेठ, लॉ कॉलेज चौकमार्गे जाऊन डॉ. देशपांडे सभागृहात समारोप झाला. दिंडीत संत तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंके, मा. म. देशमुख, जैमिनी कडू यांच्यासह अनेक प्रसिद्ध लेखकांचे जवळपास दीडशे ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीत बाल शिवाजी, जिजाऊ, तुकारामांची वेशभूषा असलेले कलाकार, भजन मंडळ, लेझीम पथकासह सहा आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच शाळकरी मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता.
आज मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने पाचवे मराठा साहित्य संमेलन उद्या (ता. 23) पासून डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद महाकवी सुधाकर गायधनी भुषवणार असून, उद्‌घाटन पंढरपूरच्या कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब लुंगे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श. नू. पठाण, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
उद्‌घाटनानंतर सार्वकालीक संत तुकाराम महाराज आणि साहित्यातील मराठा स्त्री या विषयांवर चर्चासत्र होईल. यात विचारवंत, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात प्रा. ज्ञानेश वाकुडकर व परभणीचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुख्य उपस्थितीत कविसंमेलन होईल.



No comments: