Monday, November 9, 2009

उच्चवर्णीयांच्या साहित्यात मराठा स्त्रीचे हास्यास्पद चित्रण
मराठा साहित्य संमेलनाच्या चर्चासत्रात आरोप
नागपूर, २३ मे/ प्रतिनिधी

मराठा स्त्रीच्या भावविश्वाचे प्रतिबिंब उच्चवर्णीय स्त्रियांच्या लेखनात उद्धृत झाले नसून



उच्चवर्णीय लेखकांनी मराठा स्त्रीचे हास्यास्पद रेखाटन केले असल्याचा आरोप अ.भा. मराठा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात करण्यात आला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यातील मराठा स्त्री’ या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उषा बोहरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंदा राऊत, बुलढाण्याच्या स्मिता देशमुख, यवतमाळच्या डॉ. छाया महाले आणि लातूरचे तानाजी जाधव होते.
महाले म्हणाल्या, उच्चवर्णीय स्त्रिया लिहायला लागल्यानंतर त्यांचे प्रश्न साहित्यात प्रतिबिंबित झाले. पतीव्रता स्त्रीला आदर्श मानून त्यासाठी पुराणातील सावित्री, सत्यभामा, गांधारी, कुंती या स्त्रियांचा उदोउदो करण्यात आला. मात्र त्यात मराठा स्त्रीचे भावजीवन आले नाही. शोषण, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मराठा स्त्रीच्या हाती शिक्षण हे मोठे शस्त्र दिले. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे मोठेपण सांगणारे साहित्य त्यावेळी निर्माण केले. इंदिरा तेलंग आणि सीताबाई गोडस या मराठा समाजातील स्त्रियांनी पारंपरिक लेखनापेक्षा वेगळी वाट चोखाळली. अलीकडच्या काळात प्रतिमा इंगोले, मलिका अमर शेख आणि रजनी परुळेकर यांनी स्त्रीचे वास्तव चित्र रेखाटल्याचे महाले म्हणाल्या.
तानाजी जाधव म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी साहित्याचा विषय देवी, देवता, कुणी राजा यांच्यापासून सुरु होत असे. हळूहळू शिक्षणामुळे मराठा समाजाला आलेल्या आत्मभानातून ग्रामीण साहित्यातून मराठा स्त्रीचे प्रतिबिंब दिसू लागले. त्यांनी डॉ. रा.रं. बोराडे, डॉ. मथू सावंत यांच्या साहित्यकृतींचा यावेळी धांडोळा घेतला. शिवधर्माचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रयत्नांमुळे मराठा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवधर्म स्वीकारला मात्र, त्यांच्या अर्धागिनी वैदिक धर्मातील कर्मकांड पाळतात. आजही मराठा स्त्री वैदिक गुलामगिरीतून बाहेर येऊ शकली नसल्याचे तानाजी जाधव यांनी ठासून सांगितले. स्मिता देशमुख यांनी मराठा समाजाने वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले म्हणाल्या, श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व देणे ही मराठा समाजाची खासियत आहे. लोकसाहित्यात मराठा स्त्रीचे चित्रण आले असून यमी आणि रुक्मिणी या पुराणातील स्त्रियांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. उच्चवर्णीयांच्या लेखनात मराठा स्त्रीचे चित्रण आले नसून जे काही थोडेफार लेखन झाले आहे ते हास्यास्पद आणि विनोदाच्या अंगाने आल्याचा तानाजी जाधव यांच्या आरोपाचे प्रतिमा इंगोले यांनीही समर्थन केले. ऐतिहासिक साहित्य आणि आत्मचरित्रामध्ये मराठा स्त्रीच्या चित्रणाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. संचालन रंजना चौधरी यांनी केले, तर प्रतिभा सावंत यांनी आभार मानले.

No comments: