Monday, November 9, 2009

परस्परांना समजून घेतल्यानेच जीवनप्रवास सुखी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - भिन्न स्वभाव, कार्यक्षेत्रही वेगळे, त्याही परिस्थितीत सामाजिक बांधिलकी व संसाराला सांभाळत, आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या खेडेकर दाम्पत्याने जीवनपट उलगडवून दाखविला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "आमचे जीवनगाणे' या प्रगट मुलाखतीतून त्यांनी सुखी व यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर व त्यांच्या अर्धांगिनी चिखलीच्या आमदार रेखाताई खेडेकर यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्‍याम मानव यांनी प्रगट मुलाखत घेतली. दीड तासांच्या या मुलाखतीदरम्यान खेडेकर दाम्पत्याने सामाजिक कार्यापासून ते खासगी आयुष्यातील सर्व गुपिते उपस्थितांसमोर उघड सुखी आयुष्याचे गमक सांगितले. एकमेकांप्रती विश्‍वास, प्रेम, आदर, करुणा, माया, समजूतदारपणा इत्यादी गुणांमुळेच दोघेही संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
श्‍याम मानव यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नांचे उत्तर त्यांनी आत्मविश्‍वासाने दिले. लग्न का केले, त्यामागचा उद्देश काय, पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून असलेल्या अपेक्षा इ. सांगताना त्यांनी आयुष्यातील छोटे छोटे किस्से सांगितले. आग ओकणाऱ्या व नेहमी शिवीगाळ करणाऱ्या कठोर हृदयाच्या व्यक्‍तीसोबत संसार करताना कधीही त्रास गेला नसल्याचे रेखाताईंनी सांगितले. पती रागात असेल तर पत्नीने बोलू नये आणि पत्नीचा पारा वर असेल, तर पतीने काहीही बोलू नये; असे वागले तर संसारात वादळ निर्माण होत नाही, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझे पती अनेकांना कठोर व आक्रमक वाटत असले, तरी मनाने खूप चांगले आहेत. अत्यंत भावनाशील व संवेदनशील असा हा माणूस आहे, हे माझे भाग्य आहे. या माणसाने आपल्याला प्रेमच दिले नाही, तर पावलोपावली समजून घेतले, असे उच्च शिक्षित रेखाताईंनी सांगितले. खेडेकरांनीही बायकोचे म्हणणे ऐकल्याने संसार सुखी होतो, अशी कबुली दिली.
रेखाताईंचा राजकारणातील प्रवेशाचा निर्णय कुटुंबातील सर्व सदस्यांनी सर्वानुमते घेतल्याचे सांगून खेडेकर म्हणाले, पत्नी आमदार बनल्यानंतरही आमच्यातील प्रेम कमी झाले नाही, उलट जबाबदारीनेच वागलो. दोघांनीही एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. एखादा कटू प्रसंग आलाच तर चर्चेच्या माध्यमातून सोडविला. संयुक्‍त कुटुंब असल्याने तिन्ही मुलांवर चांगले संस्कार झाले. बायको मिळणे कठीण असते, याची मला जाण होती. त्यामुळेच मी पत्नीला जीवापाड वागविले. तिने मला पसंत केले नसते, तर कदाचित मला रामदासांप्रमाणे अविवाहित राहावे लागले असते, असे ते मिस्किलपणे म्हणाले. या मुलाखतीच्या निमित्ताने दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवले.
यावेळी व्यासपीठावर प्रभाकरराव देशमुख व प्रिया देशमुख, रमेश बोरकुटे, लक्ष्मणराव बोदडे व इंदिरा बोदडे, अजय पाटील व प्रगती पाटील आणि मधुकर मेहकरे व श्रीमती मेहकरे उपस्थित होते.

No comments: